Konkan Railway (कोकणरेल्वे: काल आज आणि उद्या)

July 11, 2009Santosh No Comments »

** Apologies to those who can’t read Marathi script **

I wrote this back in 1995, thought of posting here. Comments welcome !

कोकणरेल्वे: काल आज आणि उद्या

(जून १९९५)

कोकणरेल्वे… उंचसखल डोंगराळ भाग आणि फेसाळणार्‍या नद्या यांच्यावर कुरघोडी करुन विज्ञानाच्या मदतीने स्विकारलेली एक भलीदांडगी योजना. आता तर ती बहुतांशी पुर्णही होत आलीय. पण तीच्या स्वागतासाठी सज्ज झालेलं मन मात्र साशंक आहे. तीच्यापासून होणार्‍या फायद्याने सुखावण्यापेक्षा होणार्‍या नुकसानाने मन भेडावलंय. निसर्गरम्य कोकणचा उभा छेद घेत जाणारी ही रेल्वे आपल्या रुपाने जे काही आणणार आहे त्यापेक्षा बरंच काही इथून घेऊन जाणार आहे हीच खंत मन जाळतेय. उन्नत्तीसाठीम्हणून ती येणार आहे, पण इथला समतोल पार बिघडवून जाणार आहे.बहुतांशी कोकणी माणूस हा रसिक आणि हळूवार मनाचा असतो. गर्द हिरवी रानं, नीळंशार आभाळ आणि लालभडक माती असं वेड लावणारं वातावरण लहानपणापासून बघीतल्यावर, त्यात मनमुराद भटकल्यावर तो रसीक न झाला तरच नवल! कष्टाळूपणा अंगात मुरलेला.. छक्केपंजे ठावूक नाहीत. सरळमार्गी जगणं. खिशात दमडी नसेल पण तुमची उठबस करण्यात कुठेही कमी पडणार नाही. तुमच्यावर मर्जी बसली तर कमरेचं वस्त्रही काढून देईल पण एकदा का मनातून उतरलात, की तुम्ही मेलात तरी ढुंकूनही बघणार नाही. गरजेपुरता पैसाही हातात न आल्याने मग्रुरी, व्यवहारीपणा याचा गंध नाही. कुणीही यावं आणि फसवून जावं. आपण फसवले गेलोय हे समजल्यावरही तो आपल्या नशिबाला दोष देईल. फारतर तुम्हाला शिव्या घालून तुमच्या आयाबहीणींचा, पोराटोरांचा उध्दार करीत पार आजोबा पणजोबांपर्यंत पोहोचेल, पण हातून मात्र काहीच होणार नाही. म्हणूनच जणू काही मालवणीत शिव्यांचं अमाप भांडार जपून ठेवलेलं, कधी कुणावर उधळलं जाईल सांगता यायचं नाही !इथली जमीन मात्र बरीचशी डोंगराळ आणि निकस. त्यामुळे वरुणराजाची कॄपाद्रूष्टी असूनही चार महिनेच भात, नाचणी करता येते. इतर वेळी जमीन पडीक. या चार महिन्यात जे काही कमावलं असेल, त्यावर वर्ष काढायचं. उन्हाळ्यात काजू, आंबा, फणस, कोकमं यांचं उत्पन्नं येतं, तो एक दिलासा. बाकीचं वर्ष तसं काटकसरीतच जातं. चाकोरीबाहेर जावून काही करायचं म्हणजे पैसा नसतो, तरी कुणासमोर हात पसरायची सहसा वेळ येत नाही.

इथला परिसर जेवढा निसर्गरम्य तेवढाच शांतही. डोंगराच्या कुशीत दडलेली एखादी वाडी, त्यात विखरून पडलेली दहाविस घरं… माडांच्या रांगा आणि आंब्या-फणसांच्या गर्दीत घरं शोधूनही सापडायची नाहित. एखादा मातीचा रस्ता.. त्यावरुन धूळ उडवत जाणारा एस.टी. चा तांबडा डबा.. प्रत्येक गावात एकतरी नदी, किमान एखादा मोठा ओहोळ तरी असणारच. माणसांपेक्षा पक्षांचाच दंगा जास्त. मोठे कारखाने नाहित त्यामुळे प्रदुषण, बाहेरगावच्या लोकांची वर्दळ हा प्रकार नाही. इथले सागरी किनारेही तसेच शांत. निसर्गाने नटलेले असूनही निर्जन. असं हे इथलं वातावरण.. संपूर्ण काव्यमय. इथला प्रत्येक माणूस रोज काव्य जगतो म्हटलं तरी ते वावगं ठरु नये !

पण आता हे सारं बदलणार आहे. हळूहळू बदलायला सुरूवातही झालीय. रेल्वे आल्यामुळे मुंबई अधिक ’जवळ’ येईल. दळणवळणाचं पुर्वीपेक्षा अधिक प्रभावी साधन मिळाल्यामुळे इथे कारखाने वाढतील. इथल्या रहिवाश्यांना रोजगार मिळेल. आंबे, काजू, फणस, मासे यांची निर्यात वाढेल. पर्यायाने  हाती पैसा खेळेल.

ही नाण्याची एक बाजू झाली. दुसरी बाजू तेवढीशी दिलासा देणारी नाहीय. रेल्वेमुळे मुंबईच्या गुन्हेगारी जगातली माणसं इथं दिसू लागतील. कारखाने झाले की बाहेरची माणसं डोकावतील. प्रदूषण ओघाने आलंच. जागेची टंचाई भासेल. मातीच्या भींती आणि नळ्यांचीछपरं असणार्‍या घरांऐवजी सिमेंटची घरं दिसू लागतील. सिमेंटचं जंगल फोफावेल.   झाडं निर्दयीपणे तोडली जातील. डोंगर उघडे होतील. किनारे गजबजून जातील. कोकणची   एकेक ओळख पुसली जाईल. इथला कोकणी माणूसच आमूलाग्र बदलून जाईल. जेव्हा जेव्हा खेड्यांची शहरं झाली, तेव्हा तेव्हा तीथल्या माणसांच्या मनाची दुकानं झाली – हा इतिहास आहे आणि कोकणचं भवितव्य ! कष्टळू, सरळमार्गी माणूस ही प्रतिमा पुसली जाईल. पैसा ही एकच भाषा त्याला कळेल. प्रत्येक बारीकसारीक गोष्ट तो पैशात मोजू लागेल. पैसा आल्यामुळे माजोरीपणा वाढेल. तो धुर्त आणि पुर्ण व्यवहारी होईल.. हेवेदावे, मारामार्‍या हे रोजचंच होईल. आता गणेशोत्सव, दीपावलीसारखे सण कुणाकडूनतरी पैसे उसने घेवून पण एकजूटीने करणारा  कोकणी माणूस काही वर्षानी ते स्वखर्चाने करील पण तेव्हा तो एकाकी असेल. आपल्या माणसात असूनही परका असेल.

कोकणरेल्वेचा हा प्रकल्प गल्लाभरू पुढार्‍यांना खोर्‍यानं पैसे ओढून देईल. वरीष्ठांपासून कनिष्ठापर्यंत यात गुंतलेले सारेच आपला खीसा भरुन  घेतील. पण तळागाळातल्या कोकणी माणसाच्या हातात मात्र काहीच पडणार नाही. काहीतरी हातात पडल्यासारखं वाटेल, पण ते हाती येण्यासाठी बरंच काही गमवावं लागलंय हेही जाणवेल. तरीही तोच आज सर्वाधिक आनंदलाय.. कोकणात रेल्वे येणार या एकेकाळी अशक्यप्राय भासणार्‍या कल्पनेनेच शहारुन गेलाय.

आणखी पाच-दहा वर्षांनी या कोकणात मन रमावं, गुंतून पडावं असं काहीही नसेल. उघडे-बोडके डोंगर, परदेशवासीयांनी गजबजलेले किनारे आणि सिमेंटची जंगलं यात जीव गुदमरून जाईल.. आगामी संकटाच्या या चाहूलीनेच घाबरं झालेलं हे निसर्गप्रेमी मन घेवून आतापासूनच निघायला हवंय एका नव्या कोकणच्या शोधात… जीथे एका बाजूला उंच हिरवी पर्वतरांग असेल आणि दुसर्‍या बाजूला अथांग दर्या… मात्र मधल्या निसर्गरम्य प्रदेशात खडखडाट करीत धावणारी रेल्वे नसेल…

– संतोष म्हाडेसर

Be Sociable, Share!
Email/Share

Tags: , , ,

Join the discussion


free counters